गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

मन माझे बावरे

"मन माझे बावरे"

कसे हे मन माझे बावरे,
क्षणातच इकडे तिकडे होणारे।
कधी याविषयी कधी त्याविषयी,
नकळतच खोल विचारांत गुंतणारे।।
कसे हे......

कसे हे मन माझे बावरे,
कुणाशी न बोलावे म्हणणारे।
हे सांगूनही पुढच्याला सारखे,
तरी पुन्हा बोलण्यात रमणारे।।
कसे हे.......

कसे हे मन माझे बावरे,
कुणाला काही न सांगणारे।
सर्व काही लपवून ठेवतानाही,
नकळतच सर्व गुपित उलगडणारे।।
कसे हे.......

कसे हे मन माझे बावरे,
न भेटण्याचे निर्धार करणारे।
सर्व काही आपल्यात करतानाही,
कुणाची आतुरतेने वाट बघणारे।।
कसे हे........

कसे हे मन माझे बावरे,
कधी कुणाला न आठवणारे।
कुणाच्या बोलण्यातून पडता नाव,
मग सहजच आठवणींत गुंतणारे।।
कसे हे......

कसे हे मन माझे बावरे,
माझे मलाच न कळणारे।
क्षणाक्षणाला लपंडाव खेळत मजसवे,
माझेच मला न सापडणारे।।
असे हे मन माझे बावरे....

© सागर
९४०३८२४५६६

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

"शोधार्थ माणुसकीच्या"

"शोधार्थ माणुसकीच्या"

पृथ्वीवर या जन्मास येतात माणसे,
येतात जन्मास प्राणी अनं पाखरेही।
जगतात सर्वच आपल्या कष्टाने नित्य,
मात्र मारतात इथे माणसाला माणसेही।।

मातीवर बांधतात घरे इथे माणसे,
बांधतात  घरटे अनं खोपे पाखरेही।
मिळून जोपासतात सर्व आपली घरकुलं,
मात्र जाळतात इथे इतरांची घरे माणसेही।।

संपूर्ण पृथ्वीचे उपभोगी इथे माणसे,
जगतात दाणे अनं पाण्यावर पाखरेही।
दररोज असते भटकंती अन्नाच्या शोधात,
मात्र घेतात हिरावून इथे भाकर माणसेही।।

काही दिवसांचे जगणे वसुंधरेवर माणसाचे,
जगतात क्षणिक पशु अनं पाखरेही।
एकमेकांत मिसळून चरणारी अनं रवंथणारी,
मात्र पेटवतात इथे वेगळी चूल घरचीच माणसेही।।

जगणे आज अवलंबून अर्थावर माणसाचे,
सारतात आयुष्य विनापैशाने कीटक-पाखरेही।
तरीही आयुष्य सुखात असे या जीवांचे,
मात्र दुखावतात इथे पैशासाठी इतरांना माणसेही।।

कधी सुधरणार आम्ही पृथ्वीची माणसे,
शिकवतात तत्वज्ञान जगण्याचे आम्हा पाखरेही।
देती धडे जगण्याचे अनं सुखवण्याचे सर्वा,
मात्र हरवतात इथे माणुसकीच माणसेही।।

©सागर बिसेन
   ९४०३८२४५६६

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

"माफ कर मला..."

माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।

जेव्हा गरज तुला असायची,
आपले काम सोडून मी बोलायचो।
आज मला गरज तुझी आहे,
मात्र मी नुसतंच वाट बघायचो।।
का हे असं होतंय?
मलातर आता काही समजत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।१।।

जेव्हा तू दुःखात रडायचीस,
तेव्हा मीही सोबत तुला असायचो।
माझे अश्रू आवरत नव्हते तरी,
मी मात्र एकटाच दुःखात रडायचो।।
का हे असं होतंय?
मलातर आता  दुःखही वाटत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।२।।

आपली दिवसभराची कसरत करूनही,
शेवटी तुझ्यासाठीच मी रात्र
जागायचो।
मला एकटेपणा जाणवायचा जेव्हा,
तेव्हा मात्र एकटाच ताटकळत बसायचो।।
का हे असं होतंय?
मलातर आता जागूनही होत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।३।।

तुपण रमायचीस आपल्या दुनियेत,
मीही तसाच स्वैर आपल्यांत रमायचो।
मात्र तुझ्या आर्जवांवर मी,
सतत आपले जग बाजूला ठेवायचो।।
का हे असं होतंय?
आतातर माझी कोणती दुनियाच नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।४।।

असली चूक तुझी कितीही,
तरी मी समंजसपणे समजून घ्यायचो।
मात्र माझ्या छोट्याशा खोडकरपणासाठी,
मी दहादा तुला माफी मागायचो।।
का हे असं होतंय?
चुकातर आता हातूनही घडत नाही...
तरीही,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।५।।

नाही म्हणणार तू चुकतेस म्हणून,
होतं असं कधीकधी, मी समजायचो।
लिहावं म्हणून लिहिलं शेवटी,
कितीदा तरी हे शब्दांत कोरायचो।।
का हे असं होतंय?
मीचतर माफी मागतो, तू का नाही??
तरीही,
शेवटी,
माफ कर मला, तुला वेळ देता येणार नाही।
कारण माझाच वेळ मला आता पुरत नाही।।६।।

©सागर
९४०३८२४५६६
०९/०१/२०१६

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

नववर्षाची वाट

📝नववर्षाची वाट🙏

रिते झाले दिवस सारे,
काळ तो काळा झाला।
दिवसांमागून दिवस संपले,
बघा लगेच नवा सन आला।।

बघ काळ पडद्याआड लपला,
जणू काय तो कायमचा दूर झाला।
स्वप्न सारे उद्याचे तसेच राहिले,
नवा संकल्प मनी जन्मास आला।।

बांधलेत तरी प्रत्येकाने आज,
ते प्रत्येक क्षण भूतकाळाचे।
वेध घेत नव्या योजनांचा,
तयार मन आता पुन्हा सर्वांचे।।

दिस तेच,फक्त कॅलेंडर बदलला,
तारखा अदलाबदल झाल्यात त्या तितक्या।
माणसाचे मन आहे हे वेडे सारखे,
कमीच लालसा मनात केल्यात जितक्या।।

बदल जगाचा नियम, तारखा पाळताना,
आम्ही चाललोय भविष्यास बघताना।
कधी मागे वळत कधी समोर,
सारेच आम्ही आपल्या वाटेवर चालताना।।

©सागर
9403824566