बुधवार, ३० मार्च, २०१६

विस्कटलेले शोधताना

     "विस्कटलेले शोधताना"

वादळागत जगणे झाले लोकांचे,
अचानकच येऊन निघून जाणे।
विस्कटून सजलेले आयुष्य सारे,
क्षणार्धातच नाते तोडून जाणे।।

आपण जपतो क्षणाक्षणाला नाते,
सदा काळजीने राखून ठेवणे।
मती हरवते आपल्याच लोकांची,
आवडते त्यांस हरवून जाणे।।

निर्जीव होतो जीव हा,
स्वतःच जणू स्वतःस हरपणे।
तरीही पुन्हा शोधात त्यांच्या,
शोधवाटा पुन्हा चालून जाणे।।

व्याधी त्यांच्या मनातली ही,
मधातच आयुष्याला पोखरून जाणे।
तमा नाही रे बेफिकीरांना मग,
आयुष्यात इतरांच्या आग लावून जाणे।।

शेवटच्या क्षणावरी तरीही हीच आशा,
येईल भान, पुन्हा जुळतील मने।
आपल्याच लोकांनी उठवलेल्या वादळात,
एकटेच विस्कटलेले शोधत बसणे।।

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
३० मार्च २०१६
२३.३५

सोमवार, २८ मार्च, २०१६

वाचा थोडं ऍडजस्ट करूनच

📖🖋 🚂🚃🚃🚋
ट्रेनच्या प्रवासात उभ्या उभ्या जागा ऍडजस्ट करण्यातच संपूर्ण प्रवास संपतो आणि त्यातच काही शब्द ऍडजस्ट करता करताच कविताही घडते......

✍🏽"वाचा थोडं ऍडजस्ट करूनच" 📖

सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत,
आता सर्वच गोष्टी,
ऍडजस्ट करून घ्याव्या लागतात..
मग दिवसभराचे कार्यक्रमही,
याला अपवाद नाही.
कोणत्याही गोष्टीशी संबंध जोडला तरी,
त्यात काही वाद नाही.

यामधात येणाऱ्या सर्व गोष्टी,
आता ऍडजस्टच कराव्या लागतात.
कोण जाणे का तर,
मात्र प्रत्येकजण तसेच वागतात...
यात प्रवासही वेगळा नाही,
ट्रेनच्या गर्दीपासून, बसच्या सीटपर्यंत,
आता सर्वच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात.

दिवसाच्या सुरुवातीपासून,
त्याच्या संपेपर्यंत सर्व ऍडजस्टच..
मित्रही बनवावे लागतात ऍडजस्ट करूनच,
नातेही जपावे लागतात ऍडजस्ट करूनच,
शेवटी,
मित्रांना वेळही  द्यावा लागतो...
तोही ऍडजस्ट करूनच.

नुसतीच इकडेतिकडे धावपळ आजकाल,
अनं तीही भर गर्दीतून,
अड्जस्टच करून करावी लागते..
ऍडजस्ट करूनच कामाचे ओझे,
मग कुठेतरी हलकं  होते.

कॉलेजला ऍडजस्ट, शाळेत ऍडजस्ट,
बंकही ऍडजस्ट, होमवर्कही ऍडजस्ट...
करूनच करावं लागतं.
पेपरला मार्कही ऍडजस्ट करूनच,
सेमिस्टर कित्येकांना क्लिअर करावं लागतं.

लोकांना समजून घेताना ऍडजस्ट,
लोक बोलतातही आता,
करून वेळ ऍडजस्ट.
सगळीकडे आता तीच ती एक बाब...
ऍडजस्टच्या फिलॉसॉफीचाच नुसता रुबाब.

तसं लिहायला खूप आहे या सब्जेक्टवर,
प्रत्येक गोष्टीत कराव्या लागतात ऍडजस्टवर.
पण शेवटी मला,
थांबावं लागणार इथूनच,
कारण मीही लिहितोय हे, थोडं ऍडजस्ट करूनच!!
थोडं ऍडजस्ट करूनच......

©सागर बिसेन
९४०३८२४५६६
२६/०३/२०१६

मंगळवार, २२ मार्च, २०१६

वाट नवी शोधताना

'वाट नवी शोधताना'

एकदा संपू दे हे क्षण,
नंतर काय ते बघुयात.
आयुष्याच्या या पुस्तकात,
चल नवे धडे कोरूयात।।

काही हसरे,काही दुखरे,
क्षण सारे बिनधास्त झेलूयात,
सर्व काही झालेले विसरून,
आनंदाची नवी बाग फुलवूयात।।

नसे इथे कुणाशी वैर,
सारेच आपले जवळ करूयात।
हातात हात घेऊनी तव,
सोबत सर्व वाटेवरी चालूयात।।

न परका कुणी आपल्याला,
नाते घट्ट असे बांधुयात।
जन्मभर पुरतील असे मित्र,
साठवण म्हणून सारे जपुयात।।

बघा हा दृष्टिकोन जगण्याच्या,
शक्यतोवर आपण सगळेच पाळूयात।
सोडून भेद,अहंकार जागीच सारा,
चला बालपणीचे खेळ पुन्हा खेळूयात।।

©सागर बिसेन
२०/०३/२०१६
१२. ४० दुपार

"नुसतेच बघत बसणे"

"नुसतेच बघत बसणे"

गाफील आहेत रे सगळे,
इथे कुणाला कुणाशी घेणं नाही।
सर्वच आहेत रे वेगळे,
कुणाला काहीएक देणं नाही।।

भीती वाटते सर्वांना इथे,
आपल्याकडे आहे तेही संपून जाईल।
असेल मुबलक जरी जिथे,
प्रश्न तोच, संपल्यावर कोण देईल??

नुसतेच हपापलेले सारे हव्यसापोटी,
एकमेकांचे  खेच्चुन जीव घेणारे।
भुकेल्याच्या ताटातलेही अन्न तव,
स्वतःसाठी हावरटासारखे हिसकावणारे।।

बाकी मेलेत तरी चालेल एकदा,
मात्र आपले पोट सिमेपार भरावे।
समजूतच हि घेऊन बसलेत सारे,
त्यास तरी आता कुणी काय करावे??

नुसताच पैसा व त्यासाठी लुबाडणे,
प्रलोभन आमिषांचे जिथेतिथे दाखवणे।
फसलेल्यांनाच पुन्हा पुन्हा फसवणे,
अनं वैशिष्ट्य आपले हे बघत बसणे...
नुसतेच बघत बसणे,
नुसतेच बघत बसणे।।

©सागर बिसेन
२३/०३/२०१६
८:४०