Saturday, 19 May 2018

'कविता...कधीही, कुठेही, कशीही!'

कविता?
हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी विषयाला धरून,
कधी विषयाला सोडून,
सैरावैरा भरकटत मनासारख्या...
कधी या दालनातून, कधी त्या दालनातून।

हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी आठवणीत कुणाच्या,
कधी पाठवणीत कुणासाठी,
मनाला स्पर्शणाऱ्या वाऱ्यासारख्या...
कधी हळुवार अलगद, कधी वादळासम थैमान।

हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी खूप बोलणाऱ्या,
कधी अगदी शांत असणाऱ्या,
माझ्या दुरंगी स्वभावासारख्या...
कधी कुणाला कळणाऱ्या, कधी कोड्यात पाडणाऱ्या।

हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी मला व्यक्त करणाऱ्या,
कधी तुमच्या मनास शोधणाऱ्या,
जिवलग नात्यातील समजुतीसारख्या...
कधी क्षणभर रुसणाऱ्या, पण कायम टिकणाऱ्या।

हो!
कविता अशाच असतात,
कधीही, कुठेही आणि कशाही घडणाऱ्या...

© ✍ सागर


#सागरीतरंग
शिवाजीनगर , १९-०५-१८

Wednesday, 19 April 2017

"कसं जगावं पोशिंद्याने?"

वेग वाढतोय विकासाचा झपाट्याने,
जग बदलतंय आपलं दर सेकंदाने।
बघ डोकावून आजूबाजूला मित्रा,
ऐकू येईल कुणाचेतरी आर्त रडणे।।

कोण आहे हा रडणारा, व्याकुळणारा?
हा तोचि पोशिंदा सर्वांना पोसणारा।
भरुनी सर्वांचे पोट दरदिवशी नित्याने,
स्वतः मात्र रात्रंदिस उपाशी राहणारा।।

बळीराजाचे आहे हे रडणे,हि व्यथा,
महागाईने जीव घेतला, दरडोईची हि कथा।
पिकवलेल्या पिकाला भाव नाही आता,
माझ्या भारतीय शेतकऱ्यांची दुःखद गाथा।।

यास नसे भान सण अनं समारंभाचा,
दिसंरात हा सेवक फक्त  शिवाराचा।
घाम गाळून, कष्ट करूनी मातीत,
भाव पिकास नाही त्याच्या स्वेच्छेचा।।

अरे! हा तोच आहे माझा शेतकरी,
ताट स्वतःचे अर्धवट ठेवुनी इतरांचे भरी।
पिकवून पीक स्वतः शेतात कष्टाने,
मात्र भाव त्याचा राजकारणी करी।।

या पोशिंद्यावर होतं आज राजकारण,
का रे अडकूनी आहे स्वामिनाथन?
जगणे सुखद करावयाचे आहे आता,
चला मिळुनी करू यावर मंथन....
करू यावर मंथन!!✍ © सागर बिसेन

२६/०२/२०१७