Sunday, 24 April 2016

तुझ्यात स्वतःस शोधताना

"तुझ्यात स्वतःस शोधताना"

मीपण हरवून मी माझे,तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।
सोडून साऱ्या माझ्या वाटा,तुझ्याकडूनच जगण्याचा बोध घेतो।।

मज न कळे आता,
काय खोटे नि काय खरे।
दाही दिशांतून फिरता फिरता,
फक्त तुझाच वेध घेतो...
मीपण हरवून मी माझे,
तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।।

भीती नाही आता कशाची,
जगताना आतून जोश येतो।
बेधुंद, बेभान चालणे आता,
झुगारून वाटेत जो अवरोध येतो...
मीपण हरवून मी माझे,
तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।।

तमा नाही हरण्याची, खंगण्याची,
तुझ्या जगात स्वतःस मिरवतो।
हसऱ्या छवीस बघताना तुझ्या,
आपसूकच मनातला क्रोध हरवतो...
मीपण हरवून मी माझे,
तुझ्यातच स्वतःचा शोध घेतो।।

सोडून साऱ्या माझ्या वाटा, तुझ्याकडूनच जगण्याचा बोध घेतो।।

© सागर बिसेन
२४/०४/२०१६
२०:५५
९४०३८२४५६६

Saturday, 2 April 2016

आता तुला माफ आहे.

"आता तुला माफ आहे."

तू केलेली चुकही,
आता तुला माफ आहे।
तू अबोल असणेही,
म्हणजे डोक्याला ताप आहे।।

समजावून समजावून थकलो,
तरी तोच आलाप आहे।
तुझ्या समजुतीवर सारखी,
वेड्या मनाची छाप आहे।।

कसं समजणार तुला?
हाच प्रश्न, प्रश्नांचा बाप आहे।
भर उन्हाच्या कडाक्यातही,
मला आलाय हिवताप आहे।।

हेही माहित नाही तुला,
'मैत्री' शब्दात किती व्याप आहे।
जणू वाटू लागले आता,
विचारांत आपल्या खूप गॅप आहे।।

काय करावी आशा चांगल्याची,
तुला समजावणेही पाप आहे।
म्हणून तू केलेली चुकही,
शेवटी तुलाच माफ आहे।।

© सागर बिसेन
०३/०४/२०१६
११:००