गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

वेदना

📝🌸🌸  वेदना   🌸🌸📝

वेदनांना कुठे बोलता येते,
त्या तर नुसत्या सलतात फक्त।
मज कळत नाही आता,
कसे करावे त्यांस मी व्यक्त।।

कधी आसवांची असते साथ,
शांत करून मग जाते मनाला।
दुःखाचे डोंगर कसे माजले,
सर कराया बोलवू मी कुणाला।।

हे आयुष्यच आता नखरे,
झाले मन बेभान या क्षणी।
हृदयी कळ आल्या भरुन,
भावनांचा पूर जमलाय जसा मनी।।

गप्प बसल्यात या वेदना,
बसलोय मी एकटाच रडत इथे।
आठवण मज करून देती ,
त्या पुन्हा पुन्हा जिथे तिथे।।

तरी धीर दिलाय स्वतःला,
रडणे हेची फक्त पर्याय नाही।
हा प्रवास जरी वेदनांचा असे,
तरी शोधतोय लेखणीतूनी उपाय काही।।

©सागर
२३/११/२०१५

नववर्षाच्या पायरीवर

🌸🌸नववर्षाच्या पायरीवर🌸🌸

दिस येतात अन जातात,
मागे काही सोडून जातात।
आठवणींचा मनात घर होतो,
गेलेले दिवस स्मरणात राहतात।।

बघतोय मागे वळून अनेकदा,
मी सरत्या वर्षांला सर्वदा।
खूप काही सोडलंय याने,
आठवणींत असणारे क्षण सदा।।

कळतच नाही कसा लोटला,
दिवसांचा हा वर्ष आटला।
संकल्प केलेले न झाले,
काहूर आठवणींचा मनात दाटला।।

सोडता सहज येणार नाही,
घडलेल्या चांगल्यांना विसरणार नाही।
प्रेरणा घेत यांतून आता,
नक्कीच नवे घडणार काही।।

निरोप द्यावयाचा आहे आता,
या गतकाळाला जाता जाता।
संकल्प नवे करूया अजुनी,
स्वागत नववर्षाचे करता करता।।

लिहितच स्वागत गाण कागदावर,
क्षणे आठवती सारी स्मृतिपटलावर।
झाले ते विसरून खटकलेले,
नव्याने पाऊल ठेवतोय नववर्षाच्या पायरीवर।।

©सागर
२४/१२/२०१५

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

आदरांजली देताना ..... 

आदरांजली देताना ..... 

"होती बेड्यांत अडकली पारतंत्र्याच्या,

कधीकाळी ही माझी सुंदर मायभूमी।

लढले वीर तेव्हा लढ्यात स्वातंत्र्याच्या,

जीव देता देशासाठी रक्तही न पडले कमी ॥

ही भूमी आहे शूरवीरांची, थोरांची,

जन्मास आला तो देशासाठी अमर झाला।

न जुमानता राजवटीस त्या गोर्यांची,

हर कुणी प्राण इथे वेचून जो लढला॥

ही लढाई होती अस्तित्वाची, अस्मितेची,

ज्यातूनी सर्वकाही आज आम्हास गवसले।

पण दैना का झाली या आता देशाची?

स्वार्थापायी लोक वीरांनाच विसरले ॥

कुठे बघतो स्वप्न आपण होण्यास महासत्तेचे,

एकीकडे व्यसन, दुसरीकडे वाद गुंफलेले।

वास्तविकता ही, हे दृष्य माझीया राष्ट्राचे,

स्वातंत्र्य हे जणू असे कल्पनागतच राहिले ॥

वेळ आहे अजून, काळ ओसरला नाही,

भारत काय, जगास हे आपण दाखवले आहे।

स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर करूया नवे काही,

जसे प्राण आपणासाठी त्यांनी वेचले आहे॥ 

हेची ओळी वीस मी इथे, शब्दरूपी तव कोरल्या।

जणू थोरांस ही आदरांजली, म्हणूनी आज वाहिल्या॥"

 

:- सागर बिसेन 

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

थेंबास बघताना ....

थेंबास  बघताना …… 

" पाऊस मुसळधार हा बरसताना,
बघितला टपोरा थेंब
पानावरून खाली गळताना…. 
तो प्रवास होता त्याचा,
शेंड्यापासून बुडापर्यंत पोहोचण्याचा!

अलगद टोकावरुनी सरळ,
आधार कधी पानाचा,
कधी देठाचा घेताना।
कधी विसावा पानावर 
घेत घेत…
मग हळूच खाली येताना 
लपंडाव करताना… 

तो दिसला मध्येच अचानक 
नजरेआड सहज अजूनी,
परत बघे डोकावून पानावरुनी !
 न संपे प्रवास इथेच आता. 
होता घेऊन आला रूप सुंदर 
तो थेंब टपोरा….

पण सहज बदलतसे रूप जागेनुसार,
कधी पानावर गोलाकार,
कधी देठावर चौकोनी,
कधी काठावर पर्णाच्या त्रिकोणी ।।

हसू येते हे सर्व बघुनी…
येत असावी त्यासही मजा 
टोकावरून खाली फांदीवर,
कधी देठावर, कधी पानावर,
कधी अलगदच फुलांवर…. 

हळूच खाली पोहचताना 
शेवट मातीतच होतसे त्याचा….
मी इथेच बसलोय गार वाऱ्यात.
त्याचा प्रवास रेखाटताना ……।।"


:- सागर बिसेन 
चिरेखणी, ता. तिरोडा 
९४०३८२४५६६

गुरुवार, ३० जुलै, २०१५

 मला समजून घेताना…. 

 मला समजून घेताना…. 
" वेळ अशीच का गं येणार होती,
सांग  तू मज आज ?
नसते  का प्रेमाला 
कधी भावनेची साथ ?

नव्हते मला माहित सुरुवातीला
कि स्थान हृदयात तुझ्या मला आहे।
कळलेच न मला त्यावेळी,
हे सर्व काय होत आहे!!

काय मग काळाचा मधात
असा वेध आला,
शिक्षणाच्या विषयाने थोडा
नात्यात दुरावा झाला ।

तूच बोलली होतीस ना
तुझ्या काय ते मनातले ?
विचाराही नव्हते हे त्यावेळी
मनात माझ्या आले।।

पण नकळत मग तुझ्यावर
मन माझे असे आले।
न बोलताही ते मग सोडता शाळा,
तुझसम प्रकट झाले।।

मने होती त्यावेळी
दोघांची आनंदात जुडलेली
आठवतात मज सारी क्षणे
ती तुजसवे खेळलेली !!

दरवेळी न चुकता तू
स्टेशन वर मज गाठायचीस
माझ्या येण्याची दरवेळी
अशी आतुर वाट बघायचीस !!

का नियतीने मग घोळ केला
दुरावा काळाचा कॉलेजात आला ।
पण न समजून घेता  तुने
स्वतःचाच का गं गैरसमज केला ?

न भावना उरल्यात तुझ्यात
न प्रेम माझ्यासाठी हृदयातले!
तूच आठव आता, मज विसराया,
असे मी काय वाईट केले??

पण मी हरलो नाही यात,
तुझ्या आठवणींत जिंकत आलो…

यात छंद मला इतर लागला,
कारण प्रत्येक क्षण  मला
तुने दुरावण्याचा शोधला !

खरंच  जर प्रेम होते माझ्यावर
तर का संपर्क तुने तोडला?
आपले लोक तुज खोटे वाटले,
आणि सहज का मग नवा कुणी जोडला ?

कधी समजून घेताना बोलली असतीस,
प्रेम काय असते हे शिकली असतीस ।
तर नव्हतीच हि घडी येणार
विनाकारण मी का तुला सोडणार।।

बघ वेळ आताही आहे तुजकडे,
प्रेम तुझ्यावर आहे अजून मजकडे!
कधी सोबत घालवलेले क्षण आठव,
आठवणींचा हुंदका मलाही पाठव!!

शोध स्वताला आता तू कुठे आहेस ?
त्या वेड्या लोकांच्या दुनियेत !!

जगत असेन कसा मी ?
 कर विचार जरा मनात!
 आहे तुझ्यासाठी प्रीत अजूनही
या माझ्या मनात ………. !!

©सागर 

*********************

मंगळवार, २८ जुलै, २०१५

बहरलेल्या निसर्गातून …….

बहरलेल्या निसर्गातून ……. 

बहरलेल्या निसर्गाच्या धुंदीत
न्हाहून निघाली हि सृष्टी सारी।
पावसाच्या धारांसवे आज वाटे,
जणू निसर्गाची हि किमया न्यारी ।।

रंगलेला थैमान वारा हा,
उधाण करी माझिया मनाला ।
मज भासे आज कुणी ,
येईल परतुनी भेटायला।।

आनंदाचे क्षण सारे या क्षणी,
काही असे आता बहरले ।
निसर्ग फुललाय एकदाचा,
मन सकलांचे हर्षुनी गेले।।

काळेभोर ढग कधी असे ,
निळसर आकाशातून डोकावती ।
श्रावणधारा बरसल्या अशा,
जणू आनंदाच्या गमती ।।

हसतोय वृक्ष हा मज बघुनी,
वाहते आनंदाची सरीता।
माहिती नाही मज कसे आता,
घडुनी हाती आली हि कविता।।


----------**********---------