शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

थेंबास बघताना ....

थेंबास  बघताना …… 

" पाऊस मुसळधार हा बरसताना,
बघितला टपोरा थेंब
पानावरून खाली गळताना…. 
तो प्रवास होता त्याचा,
शेंड्यापासून बुडापर्यंत पोहोचण्याचा!

अलगद टोकावरुनी सरळ,
आधार कधी पानाचा,
कधी देठाचा घेताना।
कधी विसावा पानावर 
घेत घेत…
मग हळूच खाली येताना 
लपंडाव करताना… 

तो दिसला मध्येच अचानक 
नजरेआड सहज अजूनी,
परत बघे डोकावून पानावरुनी !
 न संपे प्रवास इथेच आता. 
होता घेऊन आला रूप सुंदर 
तो थेंब टपोरा….

पण सहज बदलतसे रूप जागेनुसार,
कधी पानावर गोलाकार,
कधी देठावर चौकोनी,
कधी काठावर पर्णाच्या त्रिकोणी ।।

हसू येते हे सर्व बघुनी…
येत असावी त्यासही मजा 
टोकावरून खाली फांदीवर,
कधी देठावर, कधी पानावर,
कधी अलगदच फुलांवर…. 

हळूच खाली पोहचताना 
शेवट मातीतच होतसे त्याचा….
मी इथेच बसलोय गार वाऱ्यात.
त्याचा प्रवास रेखाटताना ……।।"


:- सागर बिसेन 
चिरेखणी, ता. तिरोडा 
९४०३८२४५६६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा