गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

वेदना

📝🌸🌸  वेदना   🌸🌸📝

वेदनांना कुठे बोलता येते,
त्या तर नुसत्या सलतात फक्त।
मज कळत नाही आता,
कसे करावे त्यांस मी व्यक्त।।

कधी आसवांची असते साथ,
शांत करून मग जाते मनाला।
दुःखाचे डोंगर कसे माजले,
सर कराया बोलवू मी कुणाला।।

हे आयुष्यच आता नखरे,
झाले मन बेभान या क्षणी।
हृदयी कळ आल्या भरुन,
भावनांचा पूर जमलाय जसा मनी।।

गप्प बसल्यात या वेदना,
बसलोय मी एकटाच रडत इथे।
आठवण मज करून देती ,
त्या पुन्हा पुन्हा जिथे तिथे।।

तरी धीर दिलाय स्वतःला,
रडणे हेची फक्त पर्याय नाही।
हा प्रवास जरी वेदनांचा असे,
तरी शोधतोय लेखणीतूनी उपाय काही।।

©सागर
२३/११/२०१५

नववर्षाच्या पायरीवर

🌸🌸नववर्षाच्या पायरीवर🌸🌸

दिस येतात अन जातात,
मागे काही सोडून जातात।
आठवणींचा मनात घर होतो,
गेलेले दिवस स्मरणात राहतात।।

बघतोय मागे वळून अनेकदा,
मी सरत्या वर्षांला सर्वदा।
खूप काही सोडलंय याने,
आठवणींत असणारे क्षण सदा।।

कळतच नाही कसा लोटला,
दिवसांचा हा वर्ष आटला।
संकल्प केलेले न झाले,
काहूर आठवणींचा मनात दाटला।।

सोडता सहज येणार नाही,
घडलेल्या चांगल्यांना विसरणार नाही।
प्रेरणा घेत यांतून आता,
नक्कीच नवे घडणार काही।।

निरोप द्यावयाचा आहे आता,
या गतकाळाला जाता जाता।
संकल्प नवे करूया अजुनी,
स्वागत नववर्षाचे करता करता।।

लिहितच स्वागत गाण कागदावर,
क्षणे आठवती सारी स्मृतिपटलावर।
झाले ते विसरून खटकलेले,
नव्याने पाऊल ठेवतोय नववर्षाच्या पायरीवर।।

©सागर
२४/१२/२०१५