आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आयुष्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ मे, २०१८

'कविता...कधीही, कुठेही, कशीही!'

कविता?
हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी विषयाला धरून,
कधी विषयाला सोडून,
सैरावैरा भरकटत मनासारख्या...
कधी या दालनातून, कधी त्या दालनातून।

हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी आठवणीत कुणाच्या,
कधी पाठवणीत कुणासाठी,
मनाला स्पर्शणाऱ्या वाऱ्यासारख्या...
कधी हळुवार अलगद, कधी वादळासम थैमान।

हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी खूप बोलणाऱ्या,
कधी अगदी शांत असणाऱ्या,
माझ्या दुरंगी स्वभावासारख्या...
कधी कुणाला कळणाऱ्या, कधी कोड्यात पाडणाऱ्या।

हो! सुचतात कविता कधीही, कुठेही आणि कशाही...
कधी मला व्यक्त करणाऱ्या,
कधी तुमच्या मनास शोधणाऱ्या,
जिवलग नात्यातील समजुतीसारख्या...
कधी क्षणभर रुसणाऱ्या, पण कायम टिकणाऱ्या।

हो!
कविता अशाच असतात,
कधीही, कुठेही आणि कशाही घडणाऱ्या...

© ✍ सागर


#सागरीतरंग
शिवाजीनगर , १९-०५-१८

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

"कसं जगावं पोशिंद्याने?"

वेग वाढतोय विकासाचा झपाट्याने,
जग बदलतंय आपलं दर सेकंदाने।
बघ डोकावून आजूबाजूला मित्रा,
ऐकू येईल कुणाचेतरी आर्त रडणे।।

कोण आहे हा रडणारा, व्याकुळणारा?
हा तोचि पोशिंदा सर्वांना पोसणारा।
भरुनी सर्वांचे पोट दरदिवशी नित्याने,
स्वतः मात्र रात्रंदिस उपाशी राहणारा।।

बळीराजाचे आहे हे रडणे,हि व्यथा,
महागाईने जीव घेतला, दरडोईची हि कथा।
पिकवलेल्या पिकाला भाव नाही आता,
माझ्या भारतीय शेतकऱ्यांची दुःखद गाथा।।

यास नसे भान सण अनं समारंभाचा,
दिसंरात हा सेवक फक्त  शिवाराचा।
घाम गाळून, कष्ट करूनी मातीत,
भाव पिकास नाही त्याच्या स्वेच्छेचा।।

अरे! हा तोच आहे माझा शेतकरी,
ताट स्वतःचे अर्धवट ठेवुनी इतरांचे भरी।
पिकवून पीक स्वतः शेतात कष्टाने,
मात्र भाव त्याचा राजकारणी करी।।

या पोशिंद्यावर होतं आज राजकारण,
का रे अडकूनी आहे स्वामिनाथन?
जगणे सुखद करावयाचे आहे आता,
चला मिळुनी करू यावर मंथन....
करू यावर मंथन!!



✍ © सागर बिसेन

२६/०२/२०१७

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

"व्यथा"

तंत्रज्ञानात जगतोय म्हणे!
माझा हा भारत देश।
काळ उलटले,वर्षे संपली,
अजूनही बदलला नाही भेष।।

राजकारणावरही राजकारण झाले,
अनेक नवनवे पक्ष आले।
मत देत देत राजकारण्यांना,
सामान्यजण सारे बेजार झाले।।

शासन येते, जाते अनं बदलते,
नवनवी धोरणे जातात आखली।
योजना साऱ्या कागदांवरी राहता,
कार्यपद्धतीची तव कंबर वाकली।।

आशान्वित इथे शेतकरी,
भुकेला झोपतोय माझा बळीराजा।
राबणारा मातीच्या घरातच राहिला,
चैनीत विसावणारा बनला राजा।।

हि व्यथा आहे सर्वांची,
हे चित्र आहे 'महाराज्याचे'।
हे काव्य आहे संपूर्ण भारताचे,
भारत मातेच्या व्याकुळ जनतेचे।।

©सागर बिसेन
३१/०८/२०१६
१६:१६

रविवार, ५ जून, २०१६

आधार

             "आधार" 

खरंच नसेल का त्रास होत?
जन्म देणाऱ्या आईबाबाला सोडताना।
नजरेसमोर बायको अन पैसा आला कि,
नाते दोघांशी खचकन तोडताना।।

आपल्या अंगावर खांद्यावर खेळवणाऱ्या,
त्या आई बाबाला आपण विसरतो।
लाखों हजारोंच्या घरात वावरताना,
त्यांना मात्र झोपडीतच सोडतो।।

काळ त्यांचा वेगळा होता,
भूतकाळाशी ते घट्ट जुडून असतात।
चकाकीच्या नवख्या दुनियेत या,
आपल्याला मग ते आवडत नसतात।।

नसते पर्वा आपल्याला कधीच,
त्यांनी आपल्यासाठी केलेल्या परिश्रमाची।
अहंकारात बुडून मुलगा जगतो,
जास्त काळजी त्याला त्याच्या इभ्रतीची।।

कितीही केलं सत्कार्य तरी,
पाहिजे तसं पुण्य मिळणार नाही।
लाभणार नाही खरं आनंद आयुष्यभर,
जर जिवंतपणी आईबाबा जवळ असणार नाही।।

©✍ सागर बिसेन
९४०३८२४५६६